सर्व खाद्य प्रेमींना माझा सप्रेम नमस्कार!!
जागतिक आहार आणि खाद्य जगतामध्ये वन पॉट मिल (असा पदार्थ जो एकाच पातेल्यात शिजवला जातो आणि त्यात कर्बोदके, प्रथिने आणि इतर सूक्ष्म पोषणमूल्ये एकत्रित उपलब्ध असतात) ही संकल्पना फार लोकप्रिय होत आहे; पण आपल्या महाराष्ट्रात किंबहुना भारतीय खाद्य संस्कृती मध्ये फार पूर्वी पासून हे पदार्थ आपल्या नकळत बनवले जातात.जे खऱ्या अर्थाने पौष्टिक आणि स्वतः मध्येच परिपूर्ण आहेत. चला तर मग आज आपण अशीच एक पाककृती शिकूया जी सोलापूर व महाराष्ट्र - कर्नाटकीय सीमाभागात पूर्वापार बनवली जाते.
*साहित्य*:-
*लाट्यांसाठी लागणारे साहित्य*:-
गव्हाचे पीठ - 1 वाटी.
ओवा - अर्धा चमचा (optional).
लाल तिखट - अर्धा चमचा.
हळद - पाव चमचा.
मीठ - चवीनुसार.
*वाटणासाठी लागणारे साहित्य* :-
ओले खोबरे : अर्धा नारळ.
कांदा : १ मध्यम आकाराचा.
कोथिंबीर : आवडीनुसार.
*रस्यासाठी लागणारे साहित्य*:-
कांद्याची पात : 3 ते 4 पाती (कांद्यासकट).
मेथीची भाजी : पाव वाटी ( निवडून साफ केलेली).
लसूण : 2 ते 3 पाकळ्या.
जीरे : 1 लहान चमचा.
तेल : 2 चमचे.
चिंच : ३ ते ४ चमचे चिंचेचा रस/कोळ.
हळद : 1 लहान चमचा.
गरम मसाला : अर्धा चमचा.
*कृती*:-
१. मेथी व कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्याव्यात.
२. वाटणासाठी घेतलेल्या कांद्याच्या स्लाइस करून तव्यामध्ये थोड्या तेलावर भाजून घ्या. कांदा थंड झाला की मिक्सर मध्ये ओले खोबरे, कोथिंबीर व भाजलेला कांदा वाटून घ्यावा.
३.कांद्याच्या पाती चे कांदे बारीक चिरून घ्यावेत.
४. लाट्यांसाठीचे साहित्य वापरून गव्हाचे पीठ मळून घ्यावे. हे पीठ चपात्यांना लागते त्या पेक्षा थोडे घट्ट असावे व १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे.
४. एक मध्यम आकाराचे पातेले गॅसवर ठेवून त्यात 2 चमचे तेल घालावे, तेल गरम झाल्यावर लसूण आणि जीरे टाकावे. कांद्याच्या पातीचा कांदा बारीक चिरून टाकावा. व एक वाफ द्यावी,कांदा लाल करू नये. आता त्यात मेथी व कांद्याची पात घालून झाकण लावून शिजवून घ्या. त्यानंतर तयार केलेले वाटण ,गरम मसाला,हळद व मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे. तयार झालेल्या मसाल्यात २ ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवावे. शेवटी चिंचेचा कोळ घालून मिठाचे प्रमाण पुन्हा तपासून पाहावे.
५. कणकेच्या 2 ते 3 लाट्या सुके पीठ लावून लाटून घ्याव्यात. व त्याचे शंकरपाळी प्रमाणे चौकोन आकार करून (चकोल्या) ते कापून कागदावर पसरून ठेवावे.
६. रस्याला उकळी आल्यानंतर ह्या चकोल्या त्यात अलगद सोडाव्यात यावेळी गॅस मध्यम आचेवर ठेवावा. जेणेकरून चकोल्या एकमेकांस चिकटणार नाहीत.
७. १०ते १५ मिनिटे चांगले उकळल्यांनतर गॅस बंद करावा.
८. चकोल्या गरम गरम असतानाच वरुन तुपाची धार घालून सर्व्ह कराव्यात.
वरील प्रमाणेच चकोल्या मध्ये सोया चंक किंवा चिकन चे तुकडे सुद्धा घालून बनविता येतील . लहान मुलांना इंडियन पास्ता म्हणून हा पदार्थ नक्की खाऊ घाला. त्यामुळे पालेभाज्यांबद्दल आवड त्यांच्या मनात निर्माण होईल.
वरण फळं किंवा गुजराती डाळ ढोकली
आणि चकोल्या यांची पाककृती सारखीच वाटत असली तरी दोन्हीची चव फार वेगळी आहे.त्यामुळे आपण नक्की ही पाककृती करून पाहावी आणि आपली प्रतिक्रिया माझ्या ईमेल वर जरूर कळवावी .
माझा ईमेल आय डी आहे -
*amahi0014@gmail.com*
धन्यवाद !!!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा